Sunday, February 10, 2019

एका पावसाची कहाणी

एकदा बादशहाला कुणीतरी विचारलं, "सत्ताविसातून नऊ गेले तर किती उरतात?" बादशहाने बिरबलाला विचारलं तर तो म्हणाला "शून्य!"

बादशहा (नेहमीप्रमाणेच) चक्रावला आणि आकडेमोड करत बसला; पण उत्तर काही जुळेना. शेवटी बिरबलानेच सांगिंतलं, "एकूण नक्षत्रे सत्तावीस, त्यातील पावसाची नऊ. जर पाऊसच पडला नाही तर उरणार काय?"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मे महिन्यातला सूर्य अख्ख्या भारतवर्षाला जाळत होता. धरतीची लाहीलाही होत होती. सगळे प्राणिमात्र तहानेने व्याकुळ झाले होते. अचानक आभाळ दाटून आलं आणि एका मुसळधार सरीने (काही काळापुरतं तरी) धरतीला शांत केलं. खरंतर मॉन्सूनला अजून अवकाश होता. पण मृगाच्या पावसापूर्वीच रोहिणीच्या सरीने हजेरी लावली. जणू भावाच्या जन्मापूर्वी झालेलं बहिणीचं आगमन!

भावाच्या आधी बहिणीचा पाळणा
मृगाच्या आधी रोहिणीचा गुळणा

बहिणीने हजेरी लावली खरी; पण थोड्यावेळापुरतीच. शेवटी माहेरवाशीणच ती. तिचं काम मधून-अधून भेट द्यायचं. खरं लक्ष दुसरीकडेच! ते काम धाकट्या भावाचं...

तो आला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात. सगळं आभाळ ढगांनी व्यापून गेलं. हवा एकदम गार झाली आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सरीवर सारी बरसू लागल्या. मृगाचं वाजत-गाजत आगमन झालं होतं!

घाटाच्या पश्चिमेला, निमुळत्या कोकणपट्टीत धबाबा तोय आदळू लागलं. कोसळलेल्या पाण्याचे लोंढे वसिष्ठी, सावित्री अशा नद्यांमधून समुद्राकडे परतू लागले.

इकडे घाटमाथे तर काळ्याशार दाट ढगांमध्ये गुरफटून गेले होते. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे इथली सदाहरित जंगलं अधिकच हिरवीकंच होत होती. कोयनेच्या जंगलात जळवांचा बुजबुजाट सुरु झाला. भीमाशंकरची शेकरं, कोयना-चांदोलीची अस्वलं, राधानगरीचे गवे आणि आंबोलीचे साप पावसापासून लपायला आसरे शोधू लागले. इथेच उगम पावणाऱ्या कृष्णा, कोयना, भीमा, नीरा या पूर्ववाहिनी नद्या आता गढूळ पाण्याने भरून वाहू लागल्या आणि त्यांच्यावर बांधलेल्या धारणांपाशी थबकल्या.

मृग नक्षत्राबरोबर आता मॉन्सूनही पुढे सरकला. दख्खनच्या पठारावर अमृतधारा वर्षू लागल्या. इथला पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस तसा हलकाच; पण हा प्रदेश कृष्णा, भीमेच्या कृपेने उन्हाळ्यातही तसा हिरवा होता. आता अधिकच हिरवा झाला.

तिकडे पूर्वेला विदर्भ उष्णतेच्या लाटांनी चांगलाच होरपळला होता. आता मात्र तिथे पावसाला सुरवात झाली. हा भाग भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यावर; त्यामुळे कधी अरबी समुद्रावरून तर कधी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे धुंवाधार पाऊस पडू लागला. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. चंद्रपूर, गडचिरोलीची साग, साल आणि बांबूची जंगलं आता आणखीनच दुर्गम झाली.

जूनचा शेवट आला. एव्हाना आर्द्रा नक्षत्र सुरू झालं होतं. पण महाराष्ट्राचा एक मोठा पट्टा अजूनही कोरडाच होता, नाशिक-नगरपासून मराठवाड्यातपर्यंत पसरलेला. हे होतं गोदावरीचं खोरं.

गोदावरी तशी भली-मोठी पूर्ववाहिनी नदी. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशापर्यंत पसरलेली. पण कृष्णा-भीमेसारखं या नदीला 'खात्रीशीर' पावसाचं वरदान नसावं. या खोऱ्याच्या दक्षिणेला, लातूर परिसरात तर परिस्थिती आणखीच वाईट. सगळा प्रदेशच  पर्जन्यछायेचा.

तीच गत पश्चिमवाहिनी तापीच्या खोऱ्याची. खान्देशची काळी, कसदार जमीन जणू कापूस आणि केळ्यासाठीच बनलेली. पण इथला उन्हाळा विदर्भासारखा आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य मराठवाडयासारखं! त्यामुळे सगळेच चातकासारखे पावसाची वाट पाहात होते.

सरते शेवटी जुलै उजाडला. पुनर्वसू नक्षत्र सुरु झाला आणि वरुणराज प्रसन्न झाला. गोदा आणि तापीही भरून वाहू लागल्या. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, सगळीकडचं रान आबादान झालं.  अशातच पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा नक्षत्रे सरली.

आता ऑगस्ट आला, म्हणजे मघा नक्षत्र. हा तर पावसाळ्याचा मध्य, सर्वात महत्वाचा. या नक्षत्राची एक गंमत आहे.

न पडतील मघा, तर ढगाकडे बघा
आणि पडतील मघा, तर चुलीपुढे ह*!

जेंव्हा मघा नक्षत्र कोरडं जातं, तेंव्हा आपल्या हाती फक्त आकाशाकडे बघायचं उरतं. आणि जेंव्हा धो-धो बरसतं, तेंव्हा? महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणंही शक्य होत नाही! यावर्षी तसंच झालं! असो.

आता मात्र दिवस वेगाने पुढे सरकत होते. पूर्वा-उत्तरा नक्षत्रेही सरली. सप्टेंबरच्या शेवटी हस्त नक्षत्र आलं. मराठवाड्यात हत्तीच्या सोंडेतून दिल्यासारखा पाऊस पाडून गेलं. धरणं पूर्ण भरली. कोकणातला भात, पश्चिम महाराष्ट्रातला ऊस, मराठवाड्यातलं सोयाबीन, विदर्भातला कापूस आणि खान्देशातली केळी... सगळीकडे आबादी-आबाद झाली.

आता आला ऑक्टोबर. म्हणजे मॉन्सूनचा शेवट. पंजाब-राजस्थानातून परतीचं वारं वाहू लागलं. हे चित्रा नक्षत्र भातासाठी महत्वाचं.


न पडतील चित्रा, तर अन्न मिळेना पितरा
पडतील चित्रा, तर भात खाईना कुत्रा

पाऊस नाही पडला तर पिंडदानासाठीही भात मिळणार नाही. आणि पडला तर इतकं भरघोस पीक येईल की कुत्रासुध्दा भात खाऊन कंटाळेल. यावेळी मात्र पर्जन्यराजाने मनावरच घेतलं. भाताचं मायंदाळ पीक आलं.

पाऊस संपला, सुगी झाली. सगळीकडची दिवाळी आनंदात साजरी झाली. आणि पुन्हा एकदा त्याने धावती भेट दिली. यावेळी मात्र पुढच्या पिकांसाठी, रब्बीच्या. नक्षत्र होतं स्वाती आणि त्या पावसाने पिकवले माणिक-मोती!

अशा प्रकारे साठा उत्तराची पावसाची कहाणी पाचा उत्तरी पूर्ण झाली!

(माझ्याच दुसऱ्या ब्लॉगवरून पुनःप्रकाशित. लेखन: दिनांक 12 ऑक्टोबर 2016)

Monday, November 25, 2013

आणि मी कवी झालो!

खरं तर कविता वगैरे करणं हा काही माझा प्रांत नाही. एकंदरीत मी कवितेपासून (आणि कवींपासूनही!) चार हात दूरच असतो. पूर्वी भा. रा. तांबे, बालकवी, कुसुमाग्रज, सुरेश भट यांच्या कविता आवडीने वाचायचो. पण त्यानंतर मात्र कवितेचा आणि माझा संबंध पार म्हणजे पारच तुटला.

पण अलीकडे काही दिवस मनाची एक विचित्र प्रकारची घुसमट होत होती. सांगता येत नाहीय, पण खूप एकटेपणा वाटू लागला होता. तसं पहिलं तर आयुष्य खूप छान चाललंय. पण तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आणि मग एकदम डोक्यात प्रकाश पडला.

मी जीव ओतून काम करत होतो. घरासाठी पुरेसा वेळ देत होतो. पण स्वतःसाठी कुठे काय करत होतो! त्यातूनच स्वतःला व्यक्त करायची जाणीव झाली. आणि अचानक कविता सुचली (पाझरली, स्रवली, प्रसवली, स्फुरली… काहीही म्हणा!).

एक शोध लागला. गद्यापेक्षा पद्यातून स्वतःला व्यक्त करणं सोपं असतं, विशेषतः आपण अस्वस्थ असतो तेव्हा! त्यातूनच मी कविता केली आणि मी कवी झालो!

आता मात्र बास झालं! कविता पुरे आणि त्यामागची अस्वस्थताही पुरे. अजून इतर बऱ्याच प्रांतात मुशाफिरी करायची आहे. तेंव्हा भेटू पुन्हा, जगाच्या पाठीवर, दुसऱ्या कुठल्यातरी स्वरुपात. कवितेव्यतिरिक्त!

Sunday, November 24, 2013

बळ

घाबरत नाही मी माझा दुबळेपणा सांगायला
हेच माझे बळ आहे सांगून ठेवतो तुम्हाला! :-)

दुनियादारी

दुनियादारी दुनियादारी हीच आमची रीत रे
चेहऱ्यावरच्या मुखवट्यावर लावू आम्ही स्मित रे

स्पष्टपणे देणार नाही कधीही नकार रे
काम मात्र करणार नाही आम्हीच ते हुश्शार रे

खोटे नाटे बोलायाला नाही आम्ही भीत रे
मनामध्ये द्वेष आणि ओठांवरती प्रीत रे

जनरीत म्हणती याला कोणी व्यवहार रे
सभ्यतेच्या बुरख्याखाली भरला की विखार रे

खोटी खोटी यारी आणि खोटा खोटा प्यार रे
पाठीमध्ये खंजीराचा करू आम्ही वार रे

गोड बोलून खोड मोडू किती आम्ही शूर रे
हीच आमची दुनियादारी बघा आम्ही थोर रे!

Friday, November 15, 2013

गुपित

जगा तुम्ही अन अम्हा जगू द्या असाच अमुचा बाणा रे
उगाच वेड्या संघर्षाच्या धनुष्यास ना ताणा रे

जगू आम्ही ते आनंदाने तुम्हीसुद्धा मस्त रहा
नकळत होउनी जाईल सारा संघर्षाचा अस्त पहा

धुऊन टाकू किल्मिष सारे अन्तर्मनही स्वच्छ करू
आणिक सारे आनंदाने पुन्हा एकदा फेर धरू

कविता वाचुनी इतरा वाटे दोन जनातील झगडा हा
सत्य असे ना खचित परी हे गुपित सांगतो तुम्हा पहा

माझ्या मनिच्या दोन तटातील वणव्याची ही आग असे
व्यक्त करुन ते तुम्हा सांगणे आज मला हे भाग असे

Thursday, November 14, 2013

भेटीलागी जगा

भेटीलागी जगा लागलीसे आस।
वाटे रात्रंदिवस मुक्त व्हावे।।

आत्मबंध सारे तोडोनी टाकावे।
उन्मुक्त जगावे सरळ आणिक।।

वाटे मनोगत सांगुनी टाकावे।
परंतु भेटेना कोणी आप्त।।

कितीतरी वेळा चुकल्या त्या गाठी।
राहिलो शेवटी एकटाची।।

सरते शेवटी केला हा प्रयत्न।
लिहूनिया ब्लॉग व्यक्त झालो।।